भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील यावल रोड परिसरामध्ये एक धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे. येथील ‘पटेल बिअर शॉपी’ नावाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही युनिटच्या डीव्हीआरसह रोख रक्कम असा एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बलवंतसिंग बहादूरसिंग पटेल (वय ५५ वर्षे, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) यांचे भुसावळ शहरातील बिअर शॉपीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर, अज्ञात चोरांनी संधी साधून दुकानाचे मुख्य कुलूप तोडले. तसेच खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर चोरांनी आपला सुगावा लागू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने ५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही युनिटचा डीव्हीआर चोरला. यासोबतच काउंटरच्या गल्ल्यात ठेवलेले २ हजार रुपये आणि दानपेटीत जमा झालेले अंदाजे ४ हजार रुपये, अशी एकूण ११ हजारांची रुपयांची रोख रक्कम व साहित्य चोरून नेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बलवंतसिंग पटेल यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगन सोनवणे हे करीत आहे.



