जामनेर प्रतिनिधी । जामनेर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम राबवत चोरी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या मोठ्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. पोलिसांनी या दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या घटनेत एका घरातून ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी आरिफखान लालखान कंजर आणि मुबारिक अली खान या दोन चोरट्यांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेली ७० हजारांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत केली असून, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली विना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत मदनीनगर भागात तब्बल ९ लाख २३ हजार रुपयांची मोठी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मोहम्मद फातीर उर्फ गोलू मिया तेफुल मोहम्मद व शेख अमीर शेख जाकीर या दोघांना ताब्यात घेतले. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने, ७१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांच्या पथकाने अत्यंत चाणाक्षपणे या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला. अटक करण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे जामनेर शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.



