ठाणे वृत्तसंस्था । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि पक्षाचे ‘ऑपरेशन टायगर’ यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रचंड धावपळ सुरू होती. या सततच्या दगदगीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश झाला. या सोहळ्यासाठी शिंदे गटातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यरात्री सव्वा एक वाजेपर्यंत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि राजकीय खलबते सुरू होती.
वास्तविक पाहता, विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. मात्र, कामाचा व्याप आणि राजकीय व्यस्ततेमुळे त्यांनी हा ताप अंगावरच काढला. रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले.
सध्या डॉक्टरांच्या एका विशेष पथकाच्या देखरेखीखाली उपमुख्यमंत्र्यांवर उपचार सुरू आहेत. सततचा प्रवास, झोपेची कमतरता आणि विश्रांतीचा अभाव यामुळे त्यांना थकवा आणि ताप आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांना काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे.



