नशिराबाद प्रतिनिधी | नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. घराच्या आवारात खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने अवघ्या तीन वर्षांच्या आकांक्षा प्रवीण इंगळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात साजरा केला होता. वाढदिवसाच्या आनंददायी आठवणी ताज्या असतानाच या घटनेने इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी घरातील सर्व सदस्य जेवणासाठी बसले होते. यावेळी आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. खेळण्याच्या नादात ती अचानक पाण्याच्या हौदात पडली. काही वेळानंतर आकांक्षा दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ती पाण्याच्या हौदात आढळून आली.
कुटुंबीयांनी तिला तातडीने हौदातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य केले.
आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. १ जुलै रोजीच तिचा तिसरा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. अवघ्या काही दिवसांतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भवानीनगर परिसर सुन्न झाला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.



