पाचोरा प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मानवी आरोग्यास घातक असलेल्या सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणाविरोधात पाचोरा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 6 हजार 600 रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी 5 जुलै रोजी रात्री शहरात गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. सुमारे 11 वाजेच्या सुमारास रेल्वे भुयारी मार्गाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबविले. त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित विमल पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे आढळून आली.
पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव सैय्यद सैफ अली सैय्यद अकबर अली, (वय 26, रा. इस्लामपुरा, भुसावळ) असे सांगितले. त्याच्याकडून विविध प्रकारचा विमल पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने आरोग्यास अपायकारक गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातलेली आहे. असे असतानाही संबंधित तरुण विक्रीच्या उद्देशाने हा प्रतिबंधित माल बाळगत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.



