चोपडा प्रतिनिधी | सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाची कथित बदनामी करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या आरोपावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नईमोद्दिन ऐनोद्दिन शेख आणि सचिन जैस्वाल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास नरेंद्र पाटील यांना व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेल्या एका पोस्टबाबत माहिती मिळाली. या पोस्टमध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन होईल, अशा स्वरूपाचा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच पोस्टमध्ये असंबंधित छायाचित्र आणि भाजपचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘कमळ’ वापरण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या पोस्टबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी फिर्यादी आणि एका साक्षीदाराने संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यावेळी अरेरावीची भाषा वापरण्यात आली तसेच दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने ओरडून शांततेचा भंग केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. याशिवाय संबंधित मजकूर मोबाईल स्टेटसवर ठेवून जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आल्याचाही आरोप आहे.
या प्रकारामुळे भाजप आणि पक्षाच्या नगरसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करीत आहेत.



