चाळीसगाव प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदिप विरूचंद गमे यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गावहाळचे काम केले होते. या कामाचे एकूण १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे फाईल पाठवण्यात आली होती. तक्रारदाराने ३ जुलै रोजी निनावे यांची भेट घेतली असता, त्यांनी एकूण बिलाच्या १ टक्क्याप्रमाणे १० हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याविरोधात धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. आज ७ जुलै रोजी एसीबीने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली, तेव्हा तडजोडीअंती ७,००० रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात, उपविभागीय अभियंता निनावे यांनी त्यांच्या दालनात ही लाचेची रक्कम सहायक कुलदिप गमे यांच्या हस्ते स्वीकारली. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.



