रावेर (प्रतिनिधी) | डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना शिवीगाळ व मारहाण झाल्याच्या कथित घटनेचे पडसाद रावेर परिसरात उमटले आहेत. या घटनेचा रावेर-यावल-सावदा-फैजपूर तापी व्हॅली आयएमए शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांना स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे, त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्ती तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून कथितरित्या शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला.
आयएमएच्या शिष्टमंडळाने रावेर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दीपा जेधे यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषींविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी, दोषींना कठोर शिक्षा द्यावी तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तहसीलदार दीपा जेधे यांनी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, सचिव डॉ. सुचिता कुयते, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. संध्या वानखेडे यांच्यासह शाखेचे सदस्य उपस्थित होते.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. रुग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करून अशा घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी भावना उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केली.



