जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निवासस्थानी अखेर ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या छायाचित्राचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी 11 जून रोजी संजय पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शरद पवार यांना त्यांच्या छायाचित्राचा वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती करणारे पत्र सादर केले होते. त्यावर शरद पवार यांनी “मान्यता” असा स्पष्ट उल्लेख करून परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त संजय पवार यांनी आपल्या निवासस्थानी विशेष बॅनर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या बॅनरवर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, खासदार पार्थ पवार, खानदेश प्रभारी तथा आमदार अनिल पाटील आणि युवा नेतृत्व म्हणून जय पवार यांची छायाचित्रे झळकविण्यात आली आहेत.
शरद पवार यांच्या परवानगीनंतर हे बॅनर लावण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्षाकडून विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.



