चोपडा प्रतिनिधी | चोपडा शहरातील नगरपालिका कार्यालयाच्या मागील भागात राहणाऱ्या काही महिलांच्या घरांवर नगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याने संबंधित कुटुंबांची घरे जमीनदोस्त झाली असून अनेक महिला व त्यांच्या कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या कारवाईनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कारवाईचा निषेध करत निळे निशाण संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली बेघर झालेल्या महिलांनी शहरातील जी.एस. मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला आज चौथा दिवस झाला असूनही प्रशासनातील कोणताही अधिकारी उपोषणस्थळी येऊन चर्चा करण्यास किंवा त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यास तयार नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आनंद बाविस्कर यांनी सांगितले की, अतिक्रमण हटविण्यापूर्वी या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा कोणताही ठोस विचार करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तातडीने या कुटुंबांना हक्काची जागा व निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि बेघर झालेल्या कुटुंबांना दिलासा मिळतो का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



