जळगाव प्रतिनिधी | अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये ट्रक चालकाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावून मृत्यूचे खरे कारण लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आरोपी जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांना मिळाली.
आज गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आरोपी पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. पोलिसांकडे आरोपीचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध असतानाही कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला रावेर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत आरोपी मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८, रा. मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर, पंजाब) याने पैशांच्या कारणावरून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्याची तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासह ट्रकला आग लावल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून PB-02-EW-4299 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची आयशर ट्रकही ताब्यात घेण्यात आली आहे. सध्या आरोपी रावेर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपासासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना झाले आहे.



