रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह नाल्याच्या कडेला टाकल्याचे पोलिस तपासात समोर झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल जखा बारेला (वय 29, रा. गारखेडा, ता. रावेर) याला 22 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय- 46) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती गावातील पोलीस पाटलांनी दिली होती. घटनास्थळी पाहणी केली असता मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान, अनिल बारेला याचे काका रामा बारेला यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे समोर आले. 21 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून अनिल याने लाकडी काठीने काकाच्या डोक्यात वार केला. गंभीर मार लागल्याने रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह सुमारे 20 ते 25 मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकण्यात आला, जेणेकरून हा प्रकार अपघाताचा वाटावा.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत अनिल बारेला याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.



