नशिराबाद प्रतिनिधी | नशिराबाद परिसरात सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरून एकूण ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे परिसरात अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. २१ जुलै रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नशिराबादहून सुनसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतात वेश्याव्यवसाय सुरू आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) व कैलास संजय भोई (दोघे रा. नशिराबाद) यांना अटक केली.
तपासादरम्यान संबंधित ठिकाणी कुंटणखाना चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी, माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



