अमळनेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका अत्यंत अनोख्या आणि भव्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले. बैलगाडी हाकणाऱ्या शेतकरी वेशातील अजितदादांचा हा राज्यातील पहिलाच पूर्णाकृती पुतळा असून, सध्या या आगळ्यावेगळ्या स्मारकाची अमळनेरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे विधिवत पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून औपचारिक अनावरण करण्यात आले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आकर्षक स्मारक उभारण्यात आले आहे.
या स्मारकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार यांचा पेहराव आणि मांडणी. गुलाबी जॅकेट, डोक्यावर पारंपरिक टोपी आणि हातात वेसण धरून बैलगाडी हाकणारा शेतकरी अवतार, अशा हुबेहूब आणि रुबाबदार रूपात अजितदादांचा हा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे. अजित पवारांचे शेतकऱ्यांशी असलेले नाते आणि त्यांचा धडाडीचा स्वभाव या स्मारकातून दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राज्यात अशा स्वरूपाचे हे पहिलेच स्मारक ठरले असून, बाजार समितीत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे आणि नागरिकाचे हे स्मारक लक्ष वेधून घेत आहे. अनावरणाच्या प्रसंगी बाजार समितीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये साकारलेले हे अनोखे स्मारक सोशल मीडियावरही चांगलेच प्रसिद्ध होत आहे.



