जळगाव प्रतिनिधी | रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा परिसरात असलेल्या सोमानी मार्केटमधील पान मसाल्याचे दुकान फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ७ जुलै च्या रात्री अज्ञात चोराने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. दुकानातील विविध कंपन्यांचे ३३ हजार रुपये किमतीचे सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रारदार सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार सुधाकर अंभोरे आणि सुशील चौधरी यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पिंप्राळा हुडको परिसरात सापळा रचला.
यावेळी सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली असून २२ जुलै रोजी त्यांना औपचारिक अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि एसडीपीओ नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर साळवे, सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी आणि सागर नन्नवरे यांनी ही यशस्वी कारवाई केली.



