यावल प्रतिनिधी | येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात शासकीय कामात अडथळा निर्माण करून प्रकल्प अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, 23 ते 24 जुलैदरम्यान आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शासकीय काम सुरू असताना आरोपी साहिल उर्फ संजय हमीद तडवी (वय 50) व रोहन साहिल तडवी (वय 30, रा. फैजपूर, ता. यावल) यांनी कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून धमक्या दिल्या तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला. या प्रकारामुळे उपस्थित कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



