यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील वड्री गावाजवळ एका युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सिकंदर इस्माईल उर्फ गफ्फार तडवी असे मृत युवकाचे नाव असून, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वड्री गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील बाळकृष्ण सदाशिव यांच्या शेतातील विहिरीत शेतमालक कामासाठी गेले असता त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना व यावल पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
यावल पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार, सिकंदर तडवी यांनी त्यांची शाहीन दुचाकी यावल येथे 20 हजारांना गहाण ठेवली होती. आर्थिक अडचणी आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी हवालदार अमित तडवी, निलेश चौधरी, अरशद गवली आणि हितेश पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे वड्री गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



