जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे उद्योगांना दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही महावितरण सबस्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसरात वाढणाऱ्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन हे सबस्टेशन उभारण्यात आले असून, त्यामुळे वीज तुटवड्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. नवीन उद्योगांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, उद्योगवाढीलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यात उद्योगांची संख्या वाढल्यामुळे वीजेची मागणी वाढली आणि विद्यमान क्षमता अपुरी पडली, तर शासनाच्या माध्यमातून आणखी नवीन सबस्टेशन उभारण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी त्यांनी राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या धोरणावरही भाष्य केले. शासनाच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसविले जाणार असले, तरी काही ठिकाणी ग्राहकांना येणाऱ्या अवाजवी वीजबिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांना योग्य आणि न्याय्य वीजबिले मिळावीत, यासाठी सरकारने आवश्यक ती उपाययोजना करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या नवीन सबस्टेशनमुळे चिंचोली व परिसरातील औद्योगिक क्षेत्राला विश्वासार्ह वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक उद्योगांच्या विस्तारासाठीही ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.



