जळगाव प्रतिनिधी | शहरातील रामानंदनगर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत ५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ससह एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी २९ जुलै रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास शिव कॉलनी परिसरातील मातोश्री हॉटेलजवळ सापळा रचून करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून (एमएच-१९-सीसी-५०१६) एक व्यक्ती ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार राहुल वाघ, शासकीय पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत नियमानुसार पूर्वपंचनामा करून पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपले नाव कल्पेश रायसिंग (वय २६, रा. शेंदणी वालकी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. सुरुवातीला त्याने अंगझडतीस विरोध करत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान दुचाकीच्या सीटखाली प्लास्टिकच्या पुडीत पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. फॉरेन्सिक तपासणीत ती एमडी सदृश अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ड्रग्स तस्करीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



