फैजपूर प्रतिनिधी | शहरातील मधुकर सहकारी साखर कारखाना परिसरातील पोस्ट कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत रोकडसह विविध साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्टमास्तर फत्तू रमजान तडवी (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर २९ जुलै रोजी सकाळी कार्यालय उघडले असता दरवाज्याचे कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कार्यालयातील २३ हजार ४५५ रुपयांची रोकड, तसेच ईएमओ मशीन, विविध रबर स्टॅम्प, पोस्टल स्टेशनरी, रेव्हेन्यू स्टॅम्प, कोरे पासबुक, एटीएम कार्ड आणि कोरे धनादेश यासह एकूण २६ हजार १७१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या घरफोडी व चोरीसंदर्भातील कलमान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे पोस्ट कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरातही खळबळ उडाली आहे.



