जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 62.07 ग्रॅम एमडी हा घातक अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, एक आरोपी अटकेत आहे. तसेच तपासादरम्यान अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका संशयिताविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफसीआय गोदामासमोरील रस्त्यावर गस्त घालत असताना पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून विविध पिशव्यांमध्ये ठेवलेला 62.07 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत 2 लाख 88 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत अमली पदार्थांसह एक मोबाईल फोन आणि मोटारसायकलही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 3 लाख 58 हजार रुपये आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात मालेगाव येथील एका संशयिताने हा अमली पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत. अमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.



