जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अण्णाभाऊ साठे स्मारकावर पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
या कार्यक्रमाला शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्मारकाला अभिवादन करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमादरम्यान “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर राहो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठीच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून लढणारे लोकशाहीर होते, असे सांगितले. त्यांच्या विचारांमधून सामाजिक एकात्मता, समता आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रद्धा, आदर आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्मारक परिसरात अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र आदरांजली अर्पण केली.



