महिनाभरापूर्वी दुरुस्ती झाली… तरीही रस्त्याची अवस्था जैसे थे!
जळगाव प्रतिनिधी | मानराज पार्क, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सिग्नल परिसर पुन्हा एकदा खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या महत्त्वाच्या चौकात वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वी स्थानिक नगरसेविका सौ. जयश्री राहुल पाटील यांनी पुढाकार घेत संबंधित यंत्रणेकडून या खड्ड्यांची दुरुस्ती करून घेतली होती. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम किंवा सततच्या पावसामुळे रस्त्याची अवस्था पुन्हा पूर्ववत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील हा महत्त्वाचा सिग्नल असल्याने येथे दररोज हजारो दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच रुग्णवाहिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महा लाईव्ह न्यूजची संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाकडे ठाम मागणी म्हणजे, या परिसरातील खड्ड्यांची केवळ तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास करता येईल.



