जळगाव प्रतिनिधी | शहरातील हॉटेल दरबार आणि सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांना चिरडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.
अधिक माहिती अशी की, मंगला माळी या नेहमीप्रमाणे पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी मुलगा भरतसोबत दुचाकीवरून जात असताना भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर मंगला माळी या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्यावरून टँकर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली.
अपघात घडल्यानंतरही टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी तत्काळ धाडस दाखवत टँकरचा पाठलाग केला आणि आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. एका निष्पाप कष्टकरी महिलेचा बेपर्वा वाहनचालकामुळे झालेला मृत्यू संतापजनक असून, भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची आणि अशा चालकांवर कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



