यावल प्रतिनिधी | शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठेत मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप करत बजरंग दलाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना निवेदन सादर केले.
शहरातील मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून दुचाकीस्वार, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बजरंग दलाने शहरातील सर्व मोकाट जनावरांची नोंद करणे, मालकीच्या जनावरांना ओळखीसाठी टॅग लावणे, संबंधित मालकांना नोटिसा बजावणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, बेवारस जनावरांची गोशाळेत व्यवस्था करणे तसेच विजेचे खांब, तारा आणि धोकादायक ठिकाणांची तपासणी करून जनावरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी सांगवी येथे विजेच्या धक्क्याने जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गोमातेच्या रक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बजरंग दलाचे तालुका संयोजक राजेंद्र बडगुजर यांनी दिला. यावेळी नंदा महाजन, हेमंत बडगुजर, ईश्वर माळी, प्रसाद बिरारी, गोपाळ बैरागी, पंकज चौधरी, निशू भोईटे आणि कृष्णा रोहम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



