जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांच्या भरधाव कारचा पाठलाग केला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही आरोपींनी कार न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाडस आणि तत्परता दाखवत काही अंतरावर कार अडवून दोघांनाही ताब्यात घेतले.
यानंतर कारची कसून झडती घेतली असता एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ही सर्व शस्त्रे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत २६ हजार रुपयांहून अधिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्रबाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



