जळगाव प्रतिनिधी | भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य चॅनेल गेटचे तसेच गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडे तोडले. त्यानंतर मंदिरात अनधिकृत प्रवेश करून थेट गाभाऱ्यात धडक मारली. गाभाऱ्यातील दोन्ही देवींच्या मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर हात साफ करत चोरट्यांनी सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या लंपास केल्या.
धार्मिक स्थळातच चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
मंदिर परिसरातील संभाव्य पुरावे आणि चोरट्यांच्या हालचालींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या धाडसी चोरीमागे नेमके कोण आहेत, त्यांचा तपास करून आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



