जळगाव प्रतिनिधी | जळगावहून चोपड्याकडे जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने विदगाव येथील तापी नदीच्या पात्रात कार कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कारमध्ये असलेले तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. सकाळी क्रेनच्या मदतीने नदीपात्रातील कार बाहेर काढण्यात आली. यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मात्र या अपघाताने विदगाव तापी पुलावरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात महिला आणि बालकाचा मृत्यू झाला होता. तरीही पुलालगत मजबूत संरक्षण भिंत किंवा लोखंडी सुरक्षा कठडे उभारण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
वारंवार अपघात होऊनही प्रशासनाला जाग कधी येणार? नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने मजबूत संरक्षण भिंत उभारावी, अशी संतप्त मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी केली आहे.



