जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद स्मारकाच्या भूमिपूजनाचा अनौपचारिक कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापालिका सीईओ जीवन धवणे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २८ जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपित्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जवानांच्या गावांमध्ये शहीद स्मारक उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्मारकाच्या उभारणीला आता सुरुवात झाली आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील मोठ्या संख्येने जवान देशसेवेत असल्याचे सांगितले.
जवानांच्या आठवणींना उजाळा देताना वीर कुटुंबीय भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी मान्यवरांनी वीर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.



