जळगाव प्रतिनिधी | जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडची ३९वी सर्वसाधारण वार्षिक सभा प्लास्टिक पार्क येथे उत्साहात पार पडली. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कृषी, सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्नप्रक्रिया, जलसंवर्धन आणि शाश्वत विकासाच्या भविष्यातील दिशेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सूक्ष्मसिंचनासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर वाढविण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचे अनिल जैन यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी ‘रिसोर्स टू रूट’ या संकल्पनेवर कंपनी काम करीत आहे.
टिश्युकल्चर रोपांची वाढती मागणी लक्षात घेता हायटेक प्लांटच्या विस्ताराचा विचार सुरू आहे. तसेच कृषी अवशेषांपासून बायोचार तयार करून त्यातून कार्बन क्रेडिटची संधी निर्माण करण्याच्या दिशेनेही कंपनीने पाऊल टाकले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केवळ सिंचन नव्हे, तर संपूर्ण ‘फार्मिंग इकोसिस्टम’ विकसित करण्यावर भर दिला जात आहे. फूड प्रोसेसिंग, फर्टिलायझर, काळी मिरी आणि कॉफी क्षेत्रातील प्रकल्पांवरही कंपनीचे लक्ष आहे.
दरम्यान, कंपनीचा एकत्रित महसूल ₹१,५०८.४ कोटी, तर EBITDA ₹१६४.३ कोटी राहिला. चांगल्या पावसामुळे कृषी मागणी वाढण्याची अपेक्षा असून आगामी काळात दुहेरी अंकातील महसूलवाढीचा विश्वास कंपनीने व्यक्त केला.



