जळगाव प्रतिनिधी | जळगाव एमआयडीसीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात आज संतप्त कामगारांनी आक्रमक आंदोलन छेडले. पैलवान अनिल भाऊ राठोड, त्यांच्या सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कामगार या आंदोलनात सहभागी झाले.
एमआयडीसी हा जळगावच्या औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो.
हजारो कामगार दररोज याच रस्त्यांवरून जीव मुठीत धरून ये-जा करतात. मात्र, रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि खराब झालेल्या मार्गांमुळे कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून, खड्ड्यांमधून प्रवास करताना शारीरिक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
विशेष म्हणजे, प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी वारंवार तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र काही दिवसांतच ही मलमपट्टी उखडते आणि परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. त्यामुळे आता केवळ दिखाऊ काम नको, तर कायमस्वरूपी तोडगा हवा, अशी आक्रमक मागणी कामगारांनी केली.
एमआयडीसीतील रस्ते दर्जेदार सिमेंट काँक्रीट किंवा डांबरीकरण करून कायमस्वरूपी मजबूत करण्यात यावेत, अशी मागणी पैलवान अनिल भाऊ राठोड आणि आंदोलकांनी केली.
प्रशासनाने तातडीने रस्त्यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही, तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि प्रशासनाला मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा संतप्त आंदोलकांनी दिला.



