यावल प्रतिनिधी | शहरातील डांगापुरा भागातील मण्यारवाडा परिसरात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री केल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे यावल पोलिसांनी शनिवारी पहाटे सहा वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकत मोठी कारवाई केली.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये सैय्यद रशिद निसार कुरेशी, सैय्यद आसिफ सैय्यद निसार, सैय्यद हफीज सैय्यद निसार कुरेशी आणि सैय्यद अन्सार सैय्यद निसार यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घराच्या तळघरातून सुमारे ६५ किलो कच्चे गोमांस जप्त केले. यासोबतच कत्तलीसाठी वापरलेली लोखंडी कुऱ्हाड, कोयता, सुरा, लाकडी कुंदा, वजनकाटा, वजनमापे आणि गोमांस विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्याही जप्त करण्यात आल्या.
याच कारवाईत सुमारे ८५ हजार रुपये किमतीची चार जिवंत गोवंश जनावरे आणि तीन म्हैसवर्गीय जनावरे, अशी एकूण सात जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. ही जनावरे कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय तळघरात बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गोमांस, जनावरे आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण ९८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



