पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील आंबेवडगाव येथे देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. पाचोरा-भडगाव मार्गावर ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बोलेरो पिकअप आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल १२ भाविक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील भाविक सिन्नर तालुक्यातील वडांगडी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बोलेरो पिकअपमधून परतत असताना आंबेवडगावजवळ पाचोराकडून जाणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या काही भाविकांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये संजय पवार, अविनाश पवार, सुनील राठोड, सुपडुबाई ईश्वर पवार, उज्ज्वलाबाई सुनील राठोड आणि मिराबाई सरिचंद राठोड यांच्यासह इतर भाविकांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.



