जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरासह जिल्ह्यात पत्रकारितेच्या नावाखाली वसुली करणाऱ्या कथित तोतया पत्रकारांचा प्रश्न गंभीर होत असल्याची चर्चा आहे. शासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल-ढाबे आणि विविध व्यावसायिकांना पत्रकार असल्याचे ओळखपत्र दाखवून दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पत्रकारितेचा धाक दाखवत असल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध कारणांनी प्रश्न विचारून त्यानंतर पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे.
याशिवाय व्यापारी, पेट्रोल पंप चालक, हॉटेल-ढाबा व्यावसायिक तसेच विविध व्यावसायिकांनाही ओळखपत्राचा धाक दाखवून पैसे मागितले जात असल्याचे आरोप होत आहेत. काही ठिकाणी किरकोळ रकमेपासून हजारो रुपयांपर्यंत मागणी होत असल्याची चर्चा असून, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
या प्रकारामुळे प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत पत्रकारांची प्रतिमाही मलिन होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख, त्यांची माध्यम संस्था, ओळखपत्राची वैधता आणि नोंदणी यांची पडताळणी करून बेकायदेशीर वसुली आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



