रावेर प्रतिनिधी | रावेर शहर व परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आल्याचा आरोप होत असून, महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील स्टेशन रोडसह विविध भागांत विना परवाना मुरूमची वाहतूक सुरू असल्याची चर्चा असून, वाळूचीही अवैध वाहतूक होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
मुरूम आणि वाळूची वाहतूक करताना आवश्यक परवाने तसेच रॉयल्टीची पूर्तता केली जात आहे की नाही, याची प्रभावी तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचेही बोलले जात आहे.
महसूल विभागाच्या संबंधित क्षेत्रात गौण खनिजाची वाहतूक सुरू असताना वाहनांची तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रावेर शहर व परिसरातील गौण खनिज वाहतुकीची वस्तुस्थिती तपासून अनधिकृत वाहतूक आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन महसूल विभागाला तपासणी व कारवाईचे निर्देश द्यावेत आणि शासनाचा संभाव्य महसूल बुडू नये यासाठी प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



