चाळीसगाव प्रतिनिधी | शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक मोहीम राबवत रेकॉर्डवरील आरोपींवर थेट कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकांनी शहरातील विविध ठिकाणी पहाटेच्या सुमारास अचानक छापे टाकले.
या विशेष मोहिमेत रेकॉर्डवरील तब्बल २५ आरोपींची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे उघडकीस आले. पहिल्या कारवाईत घरझडतीदरम्यान गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे आणि धारदार चाकू असा सुमारे ७३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत घरासमोरून तीन मोबाईल फोनसह सुमारे ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत घरातून तब्बल २३ इंच लांबीची तलवार हस्तगत करण्यात आली.
या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पहाटेच धडक देणाऱ्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



