चोपडा : अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, आता चोपडा तहसीलदार थोरात यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मे २०२६ मध्ये सावखेडा शिवारात अवैध वाळू वाहतूक व चोरीविरोधात जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात डिझेलसाठाही आढळून आला होता. त्यानंतर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत निमगव्हाण-तांदळवाडी परिसरातील अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अमळनेर व चोपडा तहसीलदारांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत निलंबनाची मागणीही करण्यात आली होती. अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर दोन्ही तहसीलदारांचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले.
अमळनेर तहसीलदारांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून चोपडा तहसीलदार थोरात यांच्याबाबतची कारवाई शासनाकडे प्रस्तावित असल्याचे समजते. दरम्यान, सुराणा यांच्या निलंबनाविरोधात महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.



