जळगाव प्रतिनिधी | जळगावात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता थेट MPDAचा दणका दिला आहे! जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तव्वीर उर्फ तन्या रहीम शेख, वय 21 वर्षे, याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले आणि औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तव्वीरविरोधात विविध गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत, दंगल, घरफोडी, आगळीक आणि आर्म्स अॅक्टसह विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, याच्याविरोधात यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर प्रतिबंधक कायद्यानुसार अंतिम बॉण्डची कारवाई तसेच हद्दपारीचा प्रस्तावही करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही आणि पुन्हा गुन्हे करण्याची प्रवृत्ती कायम राहिली.
यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी MPDAचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 14 ऑगस्ट 2026 रोजी तव्वीर शेखला ताब्यात घेऊन पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
या कारवाईमुळे वारंवार गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या व्यक्तींना पोलिसांचा कडक इशारा मिळाला आहे.



