जळगाव प्रतिनिधी | स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाचोरा तालुक्यात मोठी कारवाई केली. कुरंग्याच्या बाजाराजवळ पाचोरा रोड परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. यावेळी संशयास्पद टाटा इंडिका कारची तपासणी केली असता वाहनातून बनावट देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. कारमधून २५ बॉक्समधील तब्बल २२५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत सुमारे १४ हजार ४०० रुपये असल्याचे कारवाईच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत मद्यसाठ्यासह वाहन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात विभागाची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



