जळगाव प्रतिनिधी | महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव येथे जुनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून १३, १५ आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जवळपास पावणेदोनशे खेळाडूंसह सुमारे ५० प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पदाधिकारी जळगावात दाखल झाले आहेत.
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात १५ वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान जळगाव संघाने संभाजीनगरचा ७१-१९ असा तब्बल ५२ धावांनी पराभव करत दमदार विजयी सलामी दिली. घरच्या मैदानावर खेळताना जळगावच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले.
जळगावकडून मनीष परदेशीने १४ धावा केल्या. योगेंद्र भोळेने १४ धावांसह एक बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली, तर कार्तिकने ९ धावा करत एक बळी मिळवला. जळगावच्या भेदक गोलंदाजीसमोर संभाजीनगरचा डाव अवघ्या १९ धावांत आटोपला. संभाजीनगरकडून आर्यन पांडेने ६ धावा व एक बळी घेतला, तर ओम राऊत आणि इम्रान शेख यांनी प्रत्येकी ६ धावा केल्या.
या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड इनडोअर क्रिकेट स्पर्धेसाठी संधी मिळू शकते.
ठाणे, संभाजीनगर, बीड, सातारा, नागपूर, अमरावती यांसह विविध जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी दीपक आर्डे, किशोर चौधरी, देवदत्त पाटील, नगरसेवक निलेश तावडे, सागर पाटील, निखील पाटील यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
गुणवंत खेळाडूंच्या निवडीसाठी वैशाली भिडे-बर्वे, ओमकार पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांची निवड समिती काम पाहत आहे. पंच म्हणून नामदेव हटकर, राकेश भालेराव, सुशांत जाधव, सचिन सोनावणे, क्षितीज सोनावणे आणि सुजर वराडे जबाबदारी सांभाळत आहेत.
जळगावच्या पहिल्याच विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आगामी सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.



