यावल प्रतिनिधी | यावल शहर व परिसरभरात ७८ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण सातोद रस्तनावरील तहसील कार्यालयात सकाळी ९:०५ वाजता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी आमदार अमोल जावळे, माजी आमदार रमेश चौधरी, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली, तर विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त यावल शहरात बोरावल गेटपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेली १५० फूट भव्य तिरंगा रॅली हे मुख्य आकर्षण ठरले. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज हाती घेऊन सहभाग नोंदवला.
तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्येही ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सरदार पटेल स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल, जे. टी. महाजन स्कूल, बाल संस्कार विद्यामंदिर, चौधरी कन्या शाळा आणि सरस्वती विद्यामंदिर या शाळांमध्ये आकर्षक संचलन (परेड), संगीत कवायती, लेझीम आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व ‘कॉपीमुक्ती’ची शपथ देण्यात आली.
ग्रामीण भागात साकळी, बोराळे, कोरपावली आणि वढोदा येथेही ग्रामपंचायत व शाळांच्या माध्यमातून प्रभातफेऱ्या, बक्षीस वितरण आणि सैनिकांचा सत्कार करून स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संपूर्ण यावल परिसर दिवसभर “भारत माता की जय” च्या घोषाने आणि देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेला होता.



