जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीच्या आयोजित ग्रामसभेत विकासकामे न करता तब्बल ८३ लाख रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ग्रामसभेत तुफान गोंधळ उडाला असून, वातावरण तापल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
सभेत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामसेवक नियमित गावात येत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच काही ग्रामस्थांनी धमक्या दिल्याचाही आरोप केल्याने सभेत प्रचंड गदारोळ झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.
दरम्यान, हे सर्व आरोप सरपंच हेमंत चौधरी यांनी फेटाळून लावले आहेत. गावात अनेक विकासकामे झाल्याचा दावा करत त्यांनी ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रे मागवून पाहावीत आणि समाधान न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करावी, असे स्पष्ट केले. या वादळी ग्रामसभेमुळे ममुराबाद गावात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.



