जळगाव प्रतिनिधी | मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बालपणीच्या संघर्षमय जीवनातील अनेक भावनिक आठवणी सांगत उपस्थितांना आई-वडिलांचे महत्त्व, परिस्थितीची जाणीव आणि गर्व न करण्याचा संदेश दिला. आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगताना त्यांच्या भाषणाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
“माझी आई कशी दिसायची हे देखील मला माहिती नाही. तिचा फोटोही माझ्याकडे नाही. गल्लीतील महिला मला सांगायच्या, तुझी आई अशी दिसायची, तशी दिसायची,” अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली. माझ्या आयुष्यात तीन आई आल्या. एक जन्म देणारी, दुसरी जिने मला वाढवले आणि वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर आलेली तिसरी आई, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या कुटुंबाचा मोठा विस्तार सांगताना पाटील म्हणाले की, “मला तीन मामांची गावे आहेत. १२ मावश्या असून आम्ही १७ मावस भाऊ आणि २३ मावस बहिणी आहोत. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला इतर पाहुण्यांना बोलावले नाही तरी गर्दी मोठी होते.”
एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतरचा प्रसंगही त्यांनी सांगितला. सकाळी पोलिसांसोबत गेलो आणि सायंकाळी दुसरी आई वारल्याची बातमी मिळाली, अशी भावनिक आठवण त्यांनी सांगितली. तसेच पाडव्याच्या दिवशी चटणी-भाकर खाल्ल्याची आठवण आजही मनातून जात नसल्याचे त्यांनी नमूद केले.
गरिबीतून आलेल्या व्यक्तीने परिस्थितीचे महत्त्व कधीही विसरू नये, असे सांगताना त्यांनी स्वकीय, मित्र आणि कार्यकर्त्यांना गर्व न करण्याचा सल्ला दिला. “परिस्थिती बदलत असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे,” असे ते म्हणाले.
आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, ज्याला आई आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे सांगितले. “पहिले आई-बाबा म्हणा, नंतर साईबाबा म्हणा,” असा संदेशही त्यांनी दिला. वृद्ध आई-वडिलांची मुलांमध्ये वाटणी करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत, सहा महिने एका मुलाकडे आणि सहा महिने दुसऱ्याकडे ठेवणे योग्य नसल्याचे सांगितले.



