रावेर प्रतिनिधी | तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरुद्ध रावेर पोलिसांनी धडक ‘वॉशआऊट’ मोहीम राबवली. सहस्त्रलिंग व नेहता शिवारात केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन व दारू नष्ट केली. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
*सहस्त्रलिंग येथे २३ हजार ३०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट*
पहिली कारवाई सहस्त्रलिंग गावातील ईदगाह मैदानाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पलीकडे, आरोपीच्या शेताच्या बांधालगत असलेल्या नाल्यात करण्यात आली. याठिकाणी पोलिसांना सुमारे २०० लिटर गूळ-मोह मिश्रित कच्चे रसायन आढळून आले. त्याची अंदाजे किंमत २३ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे रसायन पोलिसांनी घटनास्थळीच नष्ट केले.
या प्रकरणी आमीन भिकारी तडवी (रा. सहस्त्रलिंग) यांच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*नेहता शिवारात तापी नदीकाठी कारवाई*
दुसरी कारवाई नेहता शिवारातील चिमणी भट्टी परिसरात तापी नदीकाठी करण्यात आली. झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले सुमारे १२० लिटर गूळ-मोह मिश्रित हातभट्टी दारूचे कच्चे रसायन पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी हे रसायन नष्ट केले.
या प्रकरणी सुकलाल वसंत सोनवणे (रा. अजंदे) यांच्याविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*पोलिसांची धडक मोहीम सुरूच*
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदिप पाटील व पोलिस उपनिरीक्षक सखाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल रुबाब तडवी, जगदीश पाटील, नितीन आमोदकर, विजय चौधरी, योगेश महाजन, कुंदन नागमल, तथागत सपकाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी या वॉशआऊट मोहिमेत सहभाग घेतला.
अवैध हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध रावेर पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



