जळगाव प्रतिनिधी | शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना शनीपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तब्बल तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यामुळे एका दुचाकी चोरीच्या तपासातून आणखी दोन वाहनचोरीच्या घटनांचा पर्दाफाश झाला आहे.
१३ ऑगस्ट रोजी बालाजीपेठ परिसरातून बजाज पल्सर मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी निलेश प्रकाश बोरसे यांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चोरीच्या वाहनाचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शेख इरफान शेख रईस, रा. एरंडोल याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्याने दुचाकी चोरीबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर त्याच्याकडून दोन बजाज पल्सर आणि एका होंडा कंपनीच्या दुचाकी अशा एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या आणखी घटनांचा तपास लागण्याची शक्यता असून, आरोपीकडून वाहनचोरीच्या आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येते का, याचा तपास शनीपेठ पोलिसांकडून सुरू आहे.



