यावल प्रतिनिधी | येथील बसस्थानकात रविवारी झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बस लोकार्पण सोहळ्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील यांचा शासकीय प्रोटोकॉलनुसार सन्मान न केल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे केवळ नगराध्यक्षांचा नव्हे, तर यावल शहरातील नागरिकांचा अपमान झाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी नगराध्यक्ष छायाताई पाटील तसेच नगरसेवक अतुल पाटील यांना मोबाईलवरून निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, कार्यक्रमादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे नगराध्यक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचेही सांगण्यात आले.
घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख शरद कोळी यांनी तातडीची बैठक घेतली. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून भविष्यात सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षांचा योग्य सन्मान आणि प्रोटोकॉल पाळण्याची मागणी करण्यात आली. प्रोटोकॉलचे उल्लंघन पुन्हा झाल्यास शिवसेना स्टाईलने सडेतोड उत्तर देण्याचा इशाराही शरद कोळी यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेस, उबाठा तसेच अपक्ष नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कार्यालयात एकत्र येत या घटनेचा निषेध केला. यावेळी नगरसेवक पराग सराफ, निसार मोमीन, इमाम रजा खान, उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकुब, नगरसेविका रूबीनाबी कच्छी, शालुबाई भालेराव, शिला सोनवणे, कमरूनिस्साबी सैफुद्यीन, समीर खान, उमर कच्छी यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकुब उपस्थित होते.



