जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ मतदार प्रारूप यादीत असून, यामध्ये १५ लाख ६७ हजार ३७५ पुरुष, १४ लाख ६९ हजार ९९७ महिला आणि ८४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
SIR सर्वेक्षणानुसार ASDD श्रेणीतील ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यामध्ये ९३ हजार ७०९ मृत मतदार, ९५ हजार ८०८ गैरहजर मतदार, २ लाख ६२ हजार ५४५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १ हजार ७४० इतर आणि ६१ हजार ३४ मतदारांची आधीच नोंदणी झालेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख २० हजार ८७२ मतदार चाळीसगाव मतदारसंघात आहेत. जामनेरमध्ये २ लाख ९६ हजार ६२६, चोपड्यात २ लाख ८५ हजार ४४१, तर अमळनेरमध्ये २ लाख ६२ हजार ५०२ मतदार आहेत.
मतदारांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत असून, ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान त्यावर कार्यवाही होणार आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.



