रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील मोहगन-आहीरवाडी परिसरात आज सकाळी सुमारे ७ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जमिनीला हादरा जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापुरी धरणाजवळ जमिनीखाली भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्का सौम्य असल्याने परिसरात कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सकाळच्या वेळी अचानक जाणवलेल्या या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांनी भूकंप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर मोहगन, आहीरवाडी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेची चर्चा सुरू झाली. काही नागरिकांनी घराबाहेर येत परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
नागरिकांनी अफवा किंवा सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीकडे दुर्लक्ष करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मोठ्या नुकसानीची माहिती नसल्याने नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



