जळगाव प्रतिनिधी | शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा 99’ पार्लरवर जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी पथकाने बुधवारी (दि. 2) अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
‘स्पा 99’मध्ये काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणाची माहिती घेत चौकशी सुरू केली होती. प्राथमिक माहितीत या पार्लरमध्ये काही नागरिकांची संशयास्पद ये-जा असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कारवाईची तयारी केली.
बुधवारी दामिनी पथकाच्या मदतीने जिल्हापेठ पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पाच तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली असून, संबंधित तरुणी सिक्कीम, नेपाळ आणि मणिपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलिसांकडून सुरू असून, पार्लरमध्ये नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या हालचाली सुरू होत्या, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींचीही माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



