रायगड प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महाड येथे झालेल्या आढावा बैठकीत गणेशोत्सव काळातील वाहतूक नियोजन आणि प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गणेशोत्सव काळात महामार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने सुविधा केंद्रे उभारणे, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी, वीज तसेच चलत स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांचा वापर करता यावा, यासाठी अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून ते सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, गणेशोत्सव काळात महामार्गावरील टोलमाफीच्या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संपर्क साधणार असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.



